इगतपुरीमधील जिंदाल कंपनीच्या आगीत ११ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ दूरवरून दिसत आहेत. या घटनेत अकरा लोक जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सुयश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मी घटनास्थळी जाणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. “कंपनीतील एका ठिकाणी अद्यापही तीन लोकं अडकले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच, आगीवर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.




