रोजंदारीवरील चालक-वाहक होणार कामावर रुजू

पुणे : आजपासून पीएमपीएमएल बस सेवा सुरू झाली असून त्यामुळे गेले पाच महिने बेरोजगार झालेल्या व आर्थिक अडचणीत आलेल्या पीएमपीएमएल मध्ये बदली व रोजंदारी वर असलेल्या चालक वाहकांना आता आधार मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांकडून या अगोदरच आगार प्रमुखांना बदली हंगामी रोजंदारी वाहनचालकांना कामावर रुजू होण्यासंदर्भात कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत.
गेले पाच महिने बस सेवा बंद असल्याने ह्या रोजंदारी वरील चालक-वाहकांना समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र आता काम सुरू झाले असल्याने त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत. पीएमपीएल बस सुरू होण्याच्या अगोदर पासूनच विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी बस सेवा सुरू झाल्यानंतर या रोजंदारीवर असलेल्या चालक-वाहकांना कामावर रुजू घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
या बाबतीत धुमाळ म्हणाल्या की, काम नसल्याने रोजंदारीवरील चालक-वाहक आर्थिक विवंचनेत होते. बस सेवा सुरू झाल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे आपण या चालक – वाहकांना बस सुरू झाल्यावर कामावर घ्यावे असा आग्रह धरला होता व त्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश ही आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना ला अटकाव करण्यासाठी जी यंत्रणा तयार करण्यात आली आहे त्यामधील संगणकीय व सर्व्हे कामासाठी महामंडळातील कायम वाहन वर्कशॉप सेवक दोन्ही महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. आजपासून २५ टक्के बस सेवा सुरू होत असल्याने ती सुरळीत चालण्यासाठी बदली हंगामी रोजंदारी चालक वाहक यांची मदत होणार आहे.




