कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पुण्यातील सर्व कोकणवासीय नागरिकांनी, संघटनांनी एकत्र येणे गरजेचे : बाबा धुमाळ

पुणे : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे व पिंपरी चिंचवड मधील सर्व कोकणवासीय नागरिकांनी, संघटनांनी एकत्र येणे आवश्यक असून त्यासाठी एकदिवसीय कोकण विकास कृती परिषद आयोजित करण्याबाबत विचार सुरू असल्याचे माजी नगरसेवक व पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले.
धुमाळ म्हणाले कोकणातला माणूस कामानिमित्त कोठेही गेला असला तरी त्याचे कोकणशी असलेले नाते कधीही तुटत नाही. तो कायम कोकणशी जोडलेला असतो. कोकणात त्याचे येणे जाणे सुरू असते, त्यामुळे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एकत्र येतील याची खात्री आहे.
या संदर्भात पुणे, पिपंरी चिंचवड शहरामध्ये स्थायिक असलेले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीय नागरिकांना संघटनांना एकत्र करून त्या परीने प्रयत्न केले जाणार आहेत. कोकण वासियांच्या सर्व लहान मोठ्या संघटनांना एकत्रीत करून कोकण च्या विकासासाठी एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना या मध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उठविण्याचे कार्य केले जाणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
कोकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
कोकणातील पर्यटनाला योग्य दिशा देणे, मुबलक पाणी साठा निर्माण करणे, अत्याधुनिक दवाखाने निर्माण करणे,
शासकीय महाविद्यालय व तांत्रिक व व्यावसायिक, मेडिकल कॉलेज उभारणे, मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना देणे, शेती विषयक पुरक व्यवसायाला चालना देणे, कोकणात जाणारे मुख्य रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी प्रयत्न करणे, फळ, फुले, भाजीपाला बाजारपेठ उपलब्ध करणे, कोकणातील ऐतिहासिक किल्ले संवर्धन करणे, कोकणात कोल्हापूर पध्दतीने छोटे छोटे बंधारे बांधणे (पाणी साठा), सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळेल अशी व्यवस्था करणे,
पर्यटन विकास विषयक व शेती विषयक स्थानिक तरूणांना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी अधिक प्राधान्य देणे, कोकणात जाण्या येण्यासाठी पुणे मुंबई तुन जास्तीत जास्त रेल्वे मार्गाची व्यवस्था करणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागासाठी शासन विशेष निधीची ज्याप्रमाणे स्वतंत्र विभाग किवा महामंडळ च्या माध्यमातून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जातो त्याप्रमाणेच कोकणाला सुध्दा विशेष दर्जा देऊन कोकणचा सर्वागीण विकासासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जावी यासाठी प्रयत्नशील राहणे, प्रत्येक गावागावात लाईट रस्ते, मुबलक पाणी, आरोग्य सुविधा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, दळणवळणसाठी सार्वजनिक बससेवा सुधारणे, कोकणातील शेतीमालाला स्थानिक पातळीवर स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, खेळ, विविध कला, जोपासणे यावर. विशेष काम करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र यावे असे आवाहन बाबा धुमाळ यांनी केले आहे.




