अजित पवारांनी नॉट रिचेबल असल्याचे सांगितले हे कारण

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली. यावेळी त्यांनी नॉन रिचेबल असल्याचे कारण सांगत प्रसारमाध्यमांविषयी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरणं आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं.
अजित पवार म्हणाले, मी नॉट रिचेबल आहे, अशा आशयाचा बातम्या दाखवल्या जात होत्या. हे सगळं बंद करा ना, तुम्ही आधी सत्यता तपासा, ती व्यक्ती कुठे आहे ते तपासा. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची असं सुरू आहे, पण बदनामी किती करायची याची एक मर्यादा असते. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या बातम्या देणं बरोबर नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. वर्तमानपत्रात देखील अशा बातम्या पाहून मला वाईट वाटलं.




