बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाही असा नाही : ठाकरे

मुंबई : आज मी राजकारणाविषयी बोलणार नाही पण काही मंडळी महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखत आहेत. राजकारण करत आहेत. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाही असा नाही. पण एक दिवशी मुख्यमंत्री पदाचा मास्क थोडा वेळ बाजूला काढून यावर मी नक्की बोलणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आज ठाकरे यांनी समाज माध्यमांच्याद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोना संदर्भात सरकार कडून करण्यात येत असलेल्या योजनांची त्यांनी जनतेला माहिती दिली. कोरोना बरोबरच, मराठा आरक्षण, महापूर, निसर्ग वादळ, शेतकरी असे मुद्दे त्यांनी आजच्या संवादामध्ये ठेवले होते. कोरोना काळात सरकार बरोबर आता जनतेने ही जबाबदारी घेण्याची वेळ आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले मुख्यमंत्री
मागच्या सरकार मध्ये असताना आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी बहुमताने नाही तर एकमताने घेतला. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले ते आपण जिंकलो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. ही लढाई लढताना आदीच्या सरकारने जे वकील दिले त्याच्यात आपण बदल केलेला नाही. देशातील सर्वोत्तम वकील आपण दिलेले आहेत. आर्ग्युमेंट करायला आपण कमी पडलो नाही. पण न्यायालयाने दिलेली स्थगिती अनाकलनीय आहे. याबाबत मी अनेक जणांशी चर्चा केली आहे. उद्या परत बैठक होईल. सर्वांची मते लक्षात घेऊन पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल.याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण सुद्धा आपल्या समाजाच्या मागणीसाठी लढणार आहोत. आरक्षणबाबत तुमच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत.
अन्यायाविरुद्ध लढा आंदोलनात जरूर करा काही हरकत नाही पण केव्हा सरकार दाद देत नसेल तेव्हा. इथ तर सरकार तुमचं आहे. मग कशाला रस्त्यावर उतरताय. तुम्हाला न्याय मिळवून देणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कृपा करून याबाबतीत कोणी गैरसमज पसरू नका.
हमीभाव नाही तर हमखास भाव
शेतकऱ्यांना आता हमीभाव नाही तर हमखास भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे पिकेल ते विकेल अस आगोदर होत पण आता जे विकेल ते पिकेल या धर्तीवर योजना केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल असा शब्द आम्ही दिला होता. हे सांगताना समाधान वाटत आहे की, जवळपास साडे 29 लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलं आहे.
कोरोना रोखण्याची जबाबदारी सर्वांची
हे कोरोनाच संकट शेवटचं असेलच असे नाही कदाचित पुढे अशी संकटे येऊ शकतील आणि एकूणच ह्या संकटातून बाहेर पडताना पुढच्या संकटाचा सामना कसा करावा ते या संकटातून आपण शिकू शकतो. लॉक डाऊन मध्ये आपण गप्प बसलो नाही. या संसर्गाची साखळी तोडतानाच आपण आरोग्यविषयक सुविधा तयार करणं हे काम आपण करत आहोत आणि आज देखील यात खंड पडला नाही. ऑक्सिजन उपलब्ध असला तरी तो पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यातून आपण मार्ग काढत आहोत.
नागरिकांनीही आता कोरोना रोखण्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे. मुंबई पुणे आणि ग्रामीण भागातही याचा प्रसार वाढत आहे. म्हणूनच १५ सप्टेंबरपासून माझं कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम आपण सुरू करत आहोत.
आता आपण एक एक गोष्टी सुरू करत आहोत पण रुग्ण संख्या वाढत असेल तर पुन्हा लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आपण ऑनलाइन शिक्षण सुरू करू शकलो सगळी सरमिसळ करत आपण शिक्षणाची सुरुवात केली आहे. मला असं वाटतं की अशी कोणतीही बाब आपण शिल्लक ठेवली नाही तिकडे सरकार म्हणून आपण आपलं काम केले नाही. निसर्ग चक्री वादळा मध्ये जवळपास ७०० कोटी रुपयांची मदत आपण बाधितांना केली. तिकडे केंद्राच पथक येऊन गेलं. त्यांनी संपूर्ण पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे. पूर्व विदर्भात पंधरा दिवसापूर्वी पूर आला होता. आपण तातडीने तत्काळ १८ कोटीची मदत दिली आहे. माझ्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त नागरिकांना सांगू इच्छितो काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे.



