महाराष्ट्र

पाच मंत्र्यांच्या गच्छंतीसाठी भाजपचा दबाव; शिंदे गट अस्वस्थ, युतीत तणाव, बावनकुळेंकडून इन्कार

मुंबई : भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत नाराजी असून असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैली ही कारणे यासाठी सांगण्यात येत आहेत. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र, या दोन पक्षांत कुठलाही वाद नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Fb img 16837376233493064729888638918603

शिवसेनेच्या या मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती, असे उभय नेत्यांनी सांगितले. याच भेटीत शहा यांनी या पाच मंत्र्यांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या पाहणीत या पाचही मंत्र्यांबाबत प्रतिकूल मत नोंदवण्यात आल्यानेच शहा यांनी तशी स्पष्ट कल्पना शिंदेंना दिल्याचे समजते.

जमिनीच्या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वक्तव्य केले. वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या प्रमुख पदावर नियुक्त्या केल्या. या सर्व बाबी सत्तार यांना भोवल्याचे बोललं जात आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या एककल्ली कार्यप्रणालीमुळेही त्यांच्याबद्दल नाराजी आहे. रोहयो, फलोत्पादन अशी महत्त्वाची खाती असतानाही ते अन्य ‘उद्योग’ करत असल्याची चर्चा आहे.

तानाजी सावंत यांच्याविरुद्ध भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन आराखडय़ातील निधी वाटप करताना अन्य सर्व मतदारसंघावर अन्याय केल्याची लेखी तक्रार केली होती. सार्वजनिक आरोग्यासारखे जनतेशी निगडित असलेल्या त्यांच्या खात्याचा कार्यभार त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात नेमलेल्या सहायकांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर मंत्री म्हणून निष्क्रियतेचा आरोप केला जात आहे. त्यांच्याच मतदारसंघातील अनेक गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. धरणगाव, नशिराबाद यासह इतर गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी मिळते. २०२१-२२ पासून अतिवृष्टी व गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. गेल्या हंगामातील ३० ते ४० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात जनतेत नाराजी असल्याचे बोललं जात आहे.

 अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री असलेले आणि एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांच्याविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यावर काही न झाल्याने भाजपच्या जवळची ही संघटना कमालीची नाराज झाली आहे.

शिंदे समर्थक आणि भाजपमधील वाढता तणाव 

शिंदे मंत्रीमंडळात ठाणे जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण या एकमेव भाजप आमदाराला स्थान आहे. ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा भाजपकडे आहेत. चव्हाण यांच्यासह एरोलीचे आमदार गणेश नाईक आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे रवींद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लावताना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मात्र साताऱ्याचे शंभुराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले. यामुळे स्थानिक भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्यातून पुन्हा गणेश नाईक आणि किसन कथोरे ही दोन चर्चेत आहेत. शिंदे आणि नाईक यांच्यात फारसा समन्वय कधीच दिसून आलेला नाही. नाईक यांचे पहिल्यांदा मंत्रिपद हुकले त्यामागेही हेच कारण असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. ठाणे जिल्ह्यात शिंदे समर्थक आणि भाजपमधील वाढता तणाव लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील राजकारणात वरचढ ठरू शकेल असा नाईक यांचा पर्याय भाजपकडून स्वीकारला जाईल का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये