समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ अपघात; 25 जणांचा मृत्यू,
6 बचावले

नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ नागपूर-पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात सहा जण बचावल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बसने पेट घेतल्याचे द्रुश्यांमध्ये दिसत आहे.

बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी असल्याचे समजते. पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला बस धडकली आणि त्यानंतर तिने पेट घेतला. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे.



बसचा दरवाजा उघडताच आला नाही
बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढे जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली.
बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळं एक तर डिझेल टॅंक फुटला असावाकिंवा डिझेल टॅंक मधूनइंजनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा, त्यामुळेचं बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जे लोक बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून 22 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अवघड आहे.



