ऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना यश ; दीपक मानकर

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली होती. या वास्तूचे संवर्धन व्हावे आणि हा वाडा राष्ट्रीय स्मारक बनावा, यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार सुरवातीपासून प्रयत्नशील होती. आज उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला असून पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नांना अखेर यश आले असल्याची भावना शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केली आहे.
भिडेवाडा संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला पुणे महापालिकेने पर्यायाने महायुती सरकारने जिंकला असून सरकारच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर भिडे वाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.
मानकर म्हणाले, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचं महान कार्य केलं. हे स्मारक राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरेल.
या ठिकाणी स्मारक व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य शासन, पुणे महापालिका यांना वेळोवेळी भेटून निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. यासाठी स्वाक्षरी मोहीम ही घेण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. आता या ठिकाणी तातडीने काम सुरू होऊन या वास्तूचे स्मारक तयार व्हावे असे मानकर म्हणाले.







