मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे.. का केली पुण्यातील वैद्यकीय तज्ञांनी विनंती..

आमची ही मागणी मान्य करा, नाहीतर उपोषण करतो..हे तसे बोलायला फार सोपे पण प्रत्यक्षात उपोषणाला बसणे, अन्न पाणी बंद करून उपोषणाला बसणे हे सोपे सहज काम नाही. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी कधी मान्य होईल ते माहीत नाही पण या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो हे नक्की. वैद्यकीय दृष्टीने याचा विचार केला तर एवढे दिवस उपोषण सुरू ठेवणे खरेच कठीण आहे, पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांचे उपोषण सुरूच आहे.
पूर्वी ब्रिटीशांच्या विरोधात परमपूज्य बापूजी उपोषणाला बसत. हे आपण सर्वांनी ऐकले आहेच पण, इतिहासात पहिल्यांदा आमरण उपोषणची नोंद साधारणपणे १९०० साली मेरीऑन डनलॉप यांची नोंद आढळून येते.
मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने आज समस्त भारत, जगभरातील लोकं ह्यांचे उपोषण पहात आहे. अहो वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ म्हणून काम करत असताना आम्ही शस्त्रक्रियेसाठी रूग्णांना सहा ते सात ऑपरेशन पुर्वी व ऑपरेशन नंतर तीन एक तास उपाशी राहण्याचा सल्ला देतो. इतका वेळ पण काही रूग्णांना भूक सहन होत नाही. परिणामतः काही रूग्णांना सलाईन लावले जाते. पण आज मनोज जरांगे पाटील हे गेले साधारणपणे सहा दिवस झाले अन्न पाणी बंद करून उपोषणाला बसले आहेत. अंत्यत मनाला वेदना होणारी ही घटना आहे.
वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ म्हणून ह्या माणसाकडे बघताना डोळ्यात पाणी येतं, किती ती इच्छा शक्ती. त्यांची मागणी मान्य होईल, किती दिवसात होईल हे कदाचित मला किंवा कोणत्याही सामान्य माणसाला सांगता येणार नाही, पण उपोषणाला बसलेल्या या माणसाकडं आता बघवत नाहीये.
वैद्यकीय विषयातील माहिती नुसार एखादा माणूस फक्त पाणी पिऊन साधारणपणे एक महिना उपोषण करू शकतो तर, अन्न आणि पाणी दोन्ही बंद करून फार फार तर एक आठवडा. आणि वैद्यकीय विषयातील हे संदर्भ प्रत्येक वेळी प्रत्येक माणसासाठी एक समान नसतात. प्रत्येक माणसा वाईज ह्यात बदल होतात. जर एखादा माणूस जाड असेल तर कदाचित अन्न पाणी बंद केले तरी शरीरासाठी लागणारी उर्जा त्याला त्याच्या अंगातील चरबी मधून मिळते. पण ज्यांना चरबी फार नाही अशा लोकांना उपोषणाचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.
हात थरथरणे, बोलण्यासाठी ताकद नसणे,चालणे मंदावणे. हृदयाची गती मंदावणे, किटोन सारखे घटक शरीरात फिरणे असे बदल शरीरात दिसायला लागतात. आज माझी एक भारताचा नागरिक म्हणून नाही तर एक वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ म्हणून जरांगे पाटील यांना विनम्र विनंती आहे की तुमच्या उपोषणाचा फार मोठा परिणाम सरकारवर झाला असून त्यांना तुमची मागणी आज ना उद्या मान्य करावीच लागेल. आज फार मोठ्या संख्येने समाज तुमच्या बरोबर उभा आहे. या समाजासाठी आपण उपोषण मागे घ्यावे.
डॉ.सचिन नागापूरकर
अस्थि व कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया तज्ञ
पुणे













