शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, आजच्या निकालाची वेळ ठरली..

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळ पासूनच या निकालाच्या निर्णयाची वाट सर्वजण पाहत आहेत. आता निकालाची वेळ ठरली असून सायंकाळी ४.३० वाजता या संदर्भातील निकाल दिला जाणार आहे.
ही केस लढवणाऱ्या वकिलांना निकालासाठी सायंकाळी ४.३० ची वेळ मेलद्वारे कळवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सायंकाळी ४.३० वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत.

आमदार अपात्रतेबाबतचा निकाल उध्दव ठाकरे की एकनाथ शिंदे यापैकी नक्की कोणाच्या बाजूने लागणार याबाबत राजकीय वर्तुळात सकाळ पासून सुरू आहे. उध्दव ठाकरे गटाकडून केस लढवणारे ॲड असीम सरोदे यांनी निकाला बाबत दोन शक्यता वर्तवल्या आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर. तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल. दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील.
या दोन शक्यतांचा विचार केला तर आता निकाल काय येतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.












