कर्वेनगरमधील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला भीषण अपघातचा धोका : प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना आवश्यक अन्यथा..

कर्वेनगर : कर्वेनगर मधील मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने उतारावरून खाली येण्याच्या ठिकाणी अपघाताचे स्पॉट बनले आहेत. या ठिकाणी नवले ब्रीज सारखे अपघात स्पॉट बनत असताना भविष्यातील भीषण अपघातासारखे अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
कर्वेनगर चौकात असणारा उड्डाणपूल वारजेकडे जाताना ज्या ठिकाणी संपतो तेथे डाव्या बाजूला काकडे प्लाझाजवळ रस्त्यावरच निराचा स्टॉल आहे. हा स्टॉल सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. कर्वेनगर चौकातील उड्डाण पुलावरून वेगाने वाहने वारजेच्या दिशेने उतरत असताना पुलाखालून पुलाकडेने येणारी वाहने काकडे प्लाझा जवळ एकत्र येतात, पण या रस्त्यावरच असणाऱ्या नीरा स्टॉल समोर थांबणाऱ्या गाड्यांमुळे पुलाकडेने येणाऱ्या वाहनांना लगेच मुख्य रस्त्यावर वळावे लागते. त्यामुळे पुलावरून वेगात येणारी वाहने व पुलाकडेने येणारी वाहने यांच्यात अपघात घडत आहेत. या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडून जीवित हानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन व वाहतूक विभागाला जाग येणार आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

उड्डाण पुलाची दुसरी बाजू म्हणजे, उड्डाण पुलावरून कोथरूड च्या दिशेने जाताना अशोक विद्यालयाजवळ ज्या ठिकाणी पुल संपतो त्याच ठिकाणी डाव्या बाजूला बस व ट्रक थांबलेले असतात. या बरोबरच दोन्ही बाजूच्या पुलामधून गेलेल्या रस्त्यावरील काही लोखंडी दुभाजक काढलेले असल्याने बेशिस्त वाहतूक होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणचे दुभाजक काढले असल्याने पुलाच्या तोंडाजवळच वाहने यू-टर्न घेत असतात. तर काही वाहने पुलावरून उतरताच दुभाजक नसल्याने अशोक विद्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतात तर काही वाहने अशोक विद्यालयाकडून पुलावरून वाहने वर खाली जा ये करत असताना धोकादायक पद्धतीने रस्ता क्रॉस करत असतात. त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा सवाल केला जात आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी कोणतीच भूमिका घेत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजीचा सूर आहे.






पुलाच्या एका टोकाला असणारा निरा स्टॉल परवानाधारक असेल तर अशा धोक्याच्या ठिकाणी त्याला कशी परवानगी देण्यात आली. प्रशासनाला या स्टॉलमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दिसत नाही का? तर पुलाच्या दुसऱ्या टोकाला अशोक विद्यालयाजवळ दुभाजक काढल्याने होत असलेली धोकादायक वाहतूक, रस्त्याच्या कडेला लागत असलेल्या बस व ट्रकमुळे होणारा अडथळा या गोष्टींचा विचार केला तर नवले ब्रीज सारखा अपघाताचा धोका कर्वेनगर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला वाढलेला दिसतो. या ठिकाणी अपघात घडून जीवित हानी झाल्यास त्याला पालिका प्रशासन व वारजे वाहतूक विभाग जबाबदार राहणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या संदर्भात वारजे कर्वेनगर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. संबधित धोकादायक ठरत असलेला पुलाजवळचा नीरा स्टॉल स्थलांतरित करण्याबाबत झोन बदलण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच अशोक विद्यालया जवळ वाहतूक विभागाला घेऊन योग्य ते नियोजन करण्यात येईल.









