महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. कृषी विकासातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून १ जुलै हा त्यांचा जन्मदिन राज्य शासन राज्य कृषी दिन म्हणून साजरा करते.

अन्नदाता शेतकरी जर समृद्ध झाला, तर राज्यासह देशही सुजलाम सुफलाम होईल हा संदेश देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे बंजारा समाजातील शेतकरी कुटुंबात झाला, अन् जणू भटक्या अन् विमुक्त जातींचा कैवारी उदयास आला.

महत्त्वाचे म्हणजे १ मे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतरावांनी महसूल मंत्रीपदाची धुरा सांभाळली. इतकेच नव्हे तर, त्यांनी पुढे सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करून राज्याच्या राजकारणात त्यांची अजातशत्रू व वादातीत राज्यकर्ते म्हणून ओळख झाली.

Img 20250508 wa0001235733770892078245

त्यांना आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविताना अग्नीदिव्यातून जावे लागले होते. कारण त्यांच्या कार्यकाळात दोन युद्धे आणि तीन दुष्काळांना सामोरे जावे लागले. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे हाताळली.

दर्जेदार कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असा शेतकऱ्यांना संदेश देऊन त्यांनी हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल केली. १९७२ च्या भीषण दुष्काळाने साऱ्या राज्यात कहर केल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार व हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा जटिल प्रश्न उभा राहिला होता. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी वसंतराव नाईक यांनी ‘रोजगार हमी योजने’ची संकल्पना मांडली. या योजनेअंतर्गत शेती व शेतीपूरक कामे मिळत गेल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला. ही अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी रोजगार हमी योजनेची मुक्तकंठाने प्रशंसा करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे अभिनंदन केले होते. राज्यातील लोकांना अवर्षण काळात धीर देताना वसंतराव नाईक म्हणाले की,”दुष्काळाच्या परिस्थितीतही महाराष्ट्रातील माणसे कुणाच्या दयेवर जगणार नाहीत, तर काबाडकष्ट करून, मानाची चटणी-भाकर मिळवतील, पण कोणापुढे हात पसरणार नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमानी इतिहास कोणाला बदलता येणार नाही”.वास्तविक पहाता, वसंतरावांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी कामगार, शेतमजूर यांना संकटकाळातही ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. राजकारणातून समाजकारण कसे करावे, हा मूलमंत्र त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, याबद्दल तत्कालीन राज्य सरकारने त्यांचा १ जुलै हा जन्म दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नावाने राबविलेले ‘वसंत बंधारे’ ही योजना राज्यात सर्वदूर राबविण्यात आली. ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ हे ब्रीद सर्वच शेतकऱ्यांनी आत्मसात करून आपल्या कृषी क्षेत्रात कार्यान्वित केलं.

वसंतराव नाईक यांच्या मते आजचा शेतकरी हा उद्याचा कारखानदार व्हायला हवा. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यात साखर कारखाने, सूत गिरण्या, कुक्कुटपालन पशुपालन, दुग्धव्यवसाय सुरू करण्यास चालना दिली. वास्तवात त्यांनी शेतकऱ्यांना उद्यमशील होण्याचा महामार्ग दाखविला. वास्तवात ते शेतकऱ्यांचे कैवारी होते. कृतज्ञतेच्या भावनेतून तत्कालीन राज्य सरकारने १९८४ मध्ये भटक्या व विमुक्त जातींच्या लोकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी अल्पदरात कर्ज मिळावे, या उद्देशाने वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळ स्थापन केले.

मराठी ही राज्यातील लोकांची बोली भाषा असल्याने, त्यांनी आपल्या कार्यकाळात प्राधान्याने तिला राजभाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य लोकांना शासकीय कामकाजातील नियम, कायदे समजणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय अन् संवाद साधणे सुकर झाले. सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य झाल्याने शासनस्तरावर जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तथा कामे यांचा निपटारा जलदगतीने होऊ लागला. मराठी राजभाषेला लोकाभिमुख करण्याचे सर्वस्वी श्रेय त्यांना जाते. याबद्दल राज्यातील मराठी माणूस हा वसंतराव नाईक यांचा सदैव ऋणी राहील.

दिवंगत वसंतराव नाईक यांचा आदर्श घेऊन राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध लाभदायक योजना राबविण्यात येत आहेत. एक रुपयाची कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची अशीच एक योजना आहे. ज्याचा असंख्य शेतकरी बांधवाना लाभ झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्य कर्तृत्वास वंदन… त्यांच्या कार्याचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊया…

०००

रणवीर राजपूत

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये