विजय खळदकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

प्रभाग ३० कर्वेनगर, होम कॉलनी मधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली.
कर्वेनगर : काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे माजी अध्यक्ष व मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. विजय खळदकर यांच्या पक्षातील प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कर्वेनगर भागातील ताकद वाढली असून होत असलेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
विजय खळदकर यांची गेले अनेक दिवसांपासून पक्षांतराची चर्चा सुरू होती, आज अखेर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश पार पडला आहे. होऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत कर्वेनगर प्रभाग 30 मध्ये खळदकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ वाढले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकीत एकत्र येऊन लढवणार असल्याचे निश्चित झाले असल्याने या प्रभागात भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा तगडा पॅनल पाहायला मिळणार आहे.

प्रभागातील नागरिकांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवता याव्यात, या उद्देशाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, तो विश्वास प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार केला असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहून, विकासकामांच्या माध्यमातून पक्षाचा आणि नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी भावना विजय खळदकर यांनी पक्ष प्रवेशानंतर व्यक्त केली आहे.



