माजी आमदार दीपक पायगुडे यांचे धरणे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरुच; सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या रस्त्याबाबत तसेच अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद नाही…

पुणे : प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने माजी आमदार दीपक पायगुडे यांचे फुलगाव, पुणे येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या रस्त्याबाबत तसेच अतिक्रमणाबाबत धरणे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरु आहे.
फुलगाव येथील शाळेच्या जागेच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने शाळेची शैक्षणिक जागा रस्ता बांधकामासाठी ताब्यात घेतल्याच्या तसेच विविध भागात अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

माजी आमदार दीपक पायगुडे गेल्या नऊ दिवसांपासून फुलगावमधील शाळेच्या परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते, ही जागा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी राखीव होती. मात्र रस्ता प्रकल्पासाठी ती घेण्यात आल्याने व अतिक्रमण केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुविधांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाचा निषेध करत पायगुडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र नऊ दिवस उलटूनही प्रशासन किंवा सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, धरणे आंदोलनामुळे दीपक पायगुडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तरीदेखील सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात ठोस उपाययोजना, तोडगा न काढल्यास बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही दीपक पायगुडे यांनी दिलेला आहे.
या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.



