पुणे शहर
सिंहगड रस्त्यावर भीषण अपघात! धावत्या बसमधून तोल जाऊन पडल्याने तरुणीचा स्कूल बस खाली चिरडून मृत्यू…

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर आज, सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. धावत्या बसमधून तोल जाऊन पडलेल्या तरुणीचा स्कूल बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 च्या सुमारास घडली.
सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ ही दुर्घटना घडली आहे. धावत्या बसच्या पुढील दरवाज्यातून 25 वर्षीय तरुणी रस्त्यावर पडली. शेजारून जाणाऱ्या स्कूलबसच्या मागील उजव्या चाकाखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कंचन खड्डा (वय 25, मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असल्याचे समजते.

खानापूरकडून स्वारगेटच्या दिशेने बस जात असताना ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्कूल बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचा सविस्तर तपास सिंहगड रस्ता पोलिसांकडून सुरू आहे.



