छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा
पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.
या भेटीदरम्यान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आणि शासनस्तरावरून त्वरित आवश्यक पाठबळ व मंजुरी देण्याची विनंती केली. शिवाजीनगर येथील सर्व पोलीस लाईनचा विकास ‘महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळा’च्या माध्यमातून करण्यात यावा. पुणे येथील ऐतिहासिक महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करून तेथे नवीन ‘इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब’ची स्थापना करावी.

एम एस आर टी सी आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार करून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व एकत्रित करावी. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महानगरपालिकेत समावेश करून तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात.
मतदारसंघातील वाकडेवाडी आणि वडारवाडी येथील पुणे महानगरपालिकेच्या पी एम सी कॉलनींचा पुनर्विकास व आधुनिकीकरण करावे. औंध येथील ब्रेमेन चौक येथे होणारी मोठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तेथे नवीन उड्डाणपूल किंवा अंडरपासची उभारणी करावी.
मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत मतदारसंघातील या विकासकामांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.



