खडकवासला धरणातील दूषित सांडपाण्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यावर; नगरसेवक अमोल बालवडकर यांची प्रशासनाला तातडीची मागणी

पुणे : “हवा प्रदूषित आता पाणीही दूषित… पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचं काय आणि जगायचं तरी कसं?” अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी खडकवासला धरणातील पाणी प्रदूषणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. धरण परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात असून, याचा थेट परिणाम पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आणि आरोग्यावर होत आहे.
अमोल बालवडकर यांनी सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी खडकवासला धरण परिसराचा दौरा करून स्थितीचे निरीक्षण केले. गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांकडून दूषित पाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचे त्यांना आढळले. “धरणात सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न केवळ धरण परिसरापुरता मर्यादित नसून, तो लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बालवडकर यांनी पुणे महानगरपालिका (पीएमसी) प्रशासनाकडे खालील तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची तपासणी करावी.प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.



आवश्यक व्यावसायिक आस्थापनांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारणे बंधनकारक करावे आणि प्रक्रिया केलेले पाणीच निर्धारित निकषांनुसार सोडले जाईल, याची खात्री करावी. गावांमधील सर्वसामान्य ग्रामस्थांना दोष देणे योग्य नाही. सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी पीएमसी किंवा राज्य शासनाची आहे. संबंधित ग्रामपंचायतींना STP उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
“पुणेकर नियमित कर भरतात, तो स्वच्छ आणि सुरक्षित नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात यावे म्हणून नाही. त्याचबरोबर खडकवासला परिसरातील ग्रामस्थांनाही योग्य सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे,” असे बालवडकर यांनी सांगितले. त्यांनी प्रशासनाला या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, सार्वजनिक आरोग्य आणि जलस्रोतांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहाण्याचे आवाहन केले. “खडकवासला धरणाचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस कृती करा. पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळालेच पाहिजे!”



बालवडकर यांच्या या तक्रारीची नोंद पुणे महानगरपालिकेकडे यशस्वीरित्या झाली असून, तक्रार टोकन क्रमांक T71430 देण्यात आला आहे. पीएमसीच्या अधिकृत खात्यातून याबाबत पुष्टी देण्यात आली आहे.
खडकवासला धरण पुणे शहराच्या मुख्य पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. मागील काही वर्षांत धरण परिसरातील अनियोजित विकास, हॉटेल्स-रिसॉर्ट्स आणि गावांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. यापूर्वीही Guillain-Barré Syndrome (GBS) सारख्या प्रकरणांमध्ये दूषित पाण्याचा संबंध जोडला गेला होता. पीएमआरडीए आणि पीएमसीकडून STP प्रकल्पांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते, परंतु अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बालवडकर यांची ही मागणी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
धरणातील पाण्याची गुणवत्ता आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली तरच पुणेकरांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.



