पुणे शहर

डेक्कन कॉलेज परिसरातील कचरा व दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कुलगुरूंना निवेदन

पुणे : येरवडा येथील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ परिसरातील लूप रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणारा कचरा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दुर्गंधीच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर कार्याध्यक्ष निखिल गायकवाड यांनी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी यांना निवेदन दिले आहे.

डेक्कन कॉलेज ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ऐतिहासिक नामांकित संस्था असून, परिसराच्या देखभाल-दुरुस्ती, सुरक्षा आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पार पाडणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Addaheading 20261008 091048 0001

लूप रोड परिसरा लगत कॉलेजच्या सीमा भिंतीच्या मागील बाजूस अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना, प्रदूषण, अपघात आणि इतर सामाजिक समस्या उद्भवत असून, स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या दुर्गंधीचा दररोज सामना करावा लागत आहे.

या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दल निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डेक्कन कॉलेज प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समन्वय साधून कचऱ्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच परिसरात कचरा साचण्यामागील कारणे काय आहेत?यासाठी जबाबदार कोण? आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात येणार आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

येत्या आठ दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निखिल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये