अहिल्यानगरमधील नाट्यगृहाचा प्रश्न सोडवू : महापौर ज्योती गाडे

६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात
अहिल्यानगर : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ च्या प्राथमिक फेरीतील अहिल्यानगर केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. अहिल्यानगर शहरातील प्रलंबित नाट्यगृहाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महापौर ज्योती गाडे यांनी यावेळी दिले.
मराठी चित्रपट निर्माते बलभीम पठारे, ज्येष्ठ रंगकर्मी मीरा महाजनी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य क्षितिज झावरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून राजेश जाधव, अरुण शेलार आणि प्रिया नेर्लेकर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी महापौर ज्योती गाडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व नाट्यसंस्था आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या. शहरातील नाट्यकलावंतांना हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापौरांनी दिलेल्या आश्वासनाचे उपस्थितांनी स्वागत केले.
केंद्र समन्वयक सागर मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक जालिंदर शिंदे यांनी आभार मानले.
