नाटक

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी शिंदे यांनी केले.

मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे.

आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Img 20231112 wa00053541767882370111537

नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न
मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत, मात्र हे करताना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी नाटकाने मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्य केले- खासदार शरद पवार
चिंचवडच्या पावन भूमीत नाट्य संमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही पवार म्हणाले.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.

नाट्य प्रशिक्षणाद्वारे रंगभूमीचा विकास-जब्बार पटेल
नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले की, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा, असे मावळते संमेलनाध्यक्ष गज्वी म्हणाले.

प्रशांत दामले यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले. नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे, असे दामले म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी केले. भोईर यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.

यावेळी वामन पंडित संपादीत ‘रंगवाचा’ या नियतकालिकाचे आणि १०० मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नांदी’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन ‘रंग निरंतर’चे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि घंटेचे पूजन करून १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त, कृष्णकुमार गोयल, पी.डी. पाटील, नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये