गर्दीच्या वेळी गुजरात कॉलनीत पालिकेच्या वाहनाची जोरदार धडक..

कोथरुड : कोथरुडची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुजरात कॉलनीमधील रस्त्यावर जड वाहनांसाठी प्रतिबंध म्हणून लावण्यात आलेल्या लोखंडी बारला आज महापालिकेच्या उद्यान विभागाच्या ट्रकने धडक दिली. या धडकेने अवजड लोखंडी बार रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही इजा झाली नसली तरी रस्त्याच्या कडेने लावण्यात आलेल्या दुचाकीचे व दुकानाच्या बाहेरील बाजूचे नुकसान झाले आहे. During the rush hour, a municipal vehicle hit the iron bar in Gujarat Colony.
वर्दळीच्या असणाऱ्या या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, मात्र ही बंदी करत असताना रस्त्याच्या सुतार दवाखाना असलेल्या बाजूलाच लोखंडी बार बसवण्यात आले आहेत तर पौड रस्त्याकडील बाजू मोकळी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पौड रस्त्याकडील बाजूने जड वाहने गुजरात कॉलनीतील रस्त्यावरून आल्यानंतर त्यांना जड वाहनास बंदीसाठी लावण्यात आलेला लोखंडी बार पुढे येत आहे. या प्रकारामुळे गर्दी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचेच चित्र येथे पाहिला मिळत आहे.
आजच्या अपघातात जड वाहनांना बंदीसाठी लावण्यात आलेला लोखंडी बार जर कोणाच्या अंगावर पडला असता तर त्याला कोणाला जबाबदार धरायचे ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्यावर जर जड वाहनांना प्रवेश बंदी करायची असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बार लावणे आवश्यक आहे. मात्र तसे करण्यात न आल्याने असे अपघात घडत असल्याचे नागरिक सांगत आहे. या संबंधात कोथरुड वाहतूक विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







