कर्वेनगर मध्ये ४५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

पुणे : pune city – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती यांच्या वतीने व पुणे महापालिका, सह्याद्री हॉस्पिटल पी.पी.सी.आर. व मुकुंद भवन ट्रस्ट, विवेक व्यासपीठ, श्री. लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने कर्वेनगर मधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे महिला वसतिगृहात ४५० बेडचे कोविड केअर सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे. या सेंटर मुळे कोथरुड, कर्वेनगर, वारजे भागातील सूक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांची क्वारंटाइनची सोय होणार आहे. 450-bed Covid Care Center started in Karvenagar; Rashtriya Swayamsevak Sangh initiative
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी मागील आठवड्यात सिंहासन न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत कर्वेनगर मधील कर्वे संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून असे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून त्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

कोरोना झाल्यानंतर ज्यांची लक्षणे सूक्ष्म आहेत पण घरी होम क्वारंटाइनची व्यवस्था नाही अशा रुग्णांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत तर घर लहान व सदस्य संख्या जास्त किंवा एकच टॉयलेट अशा कारणांमुळे होम क्वारंटाइन होता येत नाही, त्यामुळे करायचे काय असा प्रश्न रुग्णांसमोर पडत होता. परंतु कर्वे संस्थेत सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमुळे कर्वेनगर, कोथरुड मधील सर्वसामान्य रुग्णांचा मोठा प्रश्न मिटणार आहे.



महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे महिला वसतिगृहाचा परिसर मोठा आहे या वसतीगृहातील दोन इमारतींमध्ये ४५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ८ डॉक्टर्स, २५ स्वयंसेवक, महापालिकेचे कर्मचारी असा स्टाफ असणार आहे. रुग्णांच्या जेवणाची व औषध उपचाराची मोफत सोय या ठिकाणी असणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या नियोजनातून हे सेंटर चालणार आहे अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे व जनकल्याण समितीचे कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी दिली.



महापालिकेच्या वतीने या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची नाष्टा व जेवणाची व्यवस्था, स्वच्छता, कचरा उचलणे व सिक्युरिटी व्यवस्था करणे अशा सुविधा देण्यात येणार आहेत.





















