ब्राह्मण महासंघाच्या मैत्रेयी ग्राहक भंडाराचे उदघाटन.

लॉकडाऊन आणि मंदी च्या संकटकाळात महिलांनी आर्थिक स्रोत शोधावेत – आमदार मनीषा कायंदे.
उत्तम दर्जा राखल्यास व ग्राहकाभिमुख सेवा दिल्यास यश निश्चित – मंजुश्री खर्डेकर
पुणे : ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडी च्या कार्यकर्त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून बाजीराव रोड येथे ग्राहक भांडाराची स्थापना केली हे कौतुकास्पद असून लॉकडाऊन आणि मंदी च्या संकटकाळात महिलांनी एकत्र येऊन कुटुंबा च्या आधारासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत शोधणे व असे उपक्रम करणे गरजेचे असल्याचे मत आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.
ब्राह्मण महासंघाच्या मैत्रेयी ग्राहक भंडाराचे उदघाटन शिवसेना आमदार आणि प्रवक्ता मनीषा कायंदे आणि पुणे मनपा शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.उत्तम दर्जा राखल्यास व ग्राहकाभिमुख सेवा दिल्यास यश निश्चित मिळेल असेही सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.महिला सर्वार्थाने सक्षम असून महानगर पालिका आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अशा आणखीन शाखांचा विस्तार व्हावा अश्या शुभेच्छा ही मंजुश्री खर्डेकर यांनी दिल्या व यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. महिला आघाडी च्या अध्यक्ष क्रांती गोखले यांनी स्वागत, विद्या घटवाई यांनी सूत्र संचालन केले. जिल्हा महिला अध्यक्ष मधुरा बर्वे यांनी ब्राह्मण महासंघाच्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.




