कोरोना संकटकाळात सर्कस मधील कलाकारांना ऑनलाईन सर्कस प्रयोगाच्या माध्यमातून मदत ; चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम.

पुणे : pune city, Kothrud कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे रोजगार बुडाले, उद्योग धंदे बंद पडले अशा परिस्थितीत कलाकारांना ही मोठ्या प्रमाणात ह्या संकटाचा फटका बसला आहे. सर्कस मधील कलाकार ही या संकटाचा सामना करत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी त्यांची कला ऑनलाईन च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून त्याद्वारे त्यांना मदत केली जात आहे. अश्या दुर्लक्षित घटकांना एक हात मदतीचा देणे हे मी माझे कर्तव्य मानतो, असे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोथरूड मधील स्वप्नशिल्प सोसायटीत सर्कसचा ऑनलाईन प्रयोग सादर करण्यात आला, त्यावेळी पाटील बोलत होते. या उपक्रमाच्या समन्वयक भाजप उद्योग आघाडीच्या संयोजिका अमृता देवगावकर म्हणाल्या की, आत्तापर्यंत 23 ऑनलाईन प्रयोग झाले असून त्या माध्यमातून आत्तापर्यंत 23 कलाकारांना प्रत्येकी 5000/ रुपये मदत देण्यात आली आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य केले असून रॅम्बो सर्कस चे विदूषक प्रत्येक सोसायटीत उपस्थित राहून बाल गोपालांचे मनोरंजन करणार आहेत. असे प्रयोग झूम आणि youtube च्या माध्यमातून विविध शाळांमध्ये मागच्या महिन्यात खूप यशस्वी पणे पार पडले. ह्याच विचाराने आता सोसायटीतील नागरिकांना व मुलांना निखळ आनंद देण्यासाठी ऑनलाइन सर्कस दाखवण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. या मध्ये विदूषक हा प्रत्यक्षात उपस्थित राहून मुलांचे मनोरंजन करेल व सर्कस हि प्रोजेक्टर व स्क्रीन च्या माध्यमातून दाखवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
शाळा बंद च्या कालावधीत लहान मुले ही घरात बसून कंटाळली आहेत त्यामुळे स्वप्नशिल्प सोसायटी पासून सुरुवात करून विविध सोसायटी / वस्ती भागात व मनपा शाळेतील मुलांना कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाईन प्रयोग दाखवून विदूषकाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून नागरिकांच्या मनावरील ताण हलका होऊन कोरोना संकटाचे मळभ दूर होण्यास मदत होईल असेही सोसायटी विभागातील कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

विपरीत परिस्थितीशी झगडून सर्कस ची कला टिकविणारे रँबो सर्कस चे संचालक सुजित दिलीप यांचा यावेळी पाटील हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वप्नशिल्प सोसायटीचे दिलीप देशपांडे, विवेक विप्रदास, प्रशांत भोलागीर, सुभाष झानपुरे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, उद्योग आघाडीचे संतोष परदेशी, रामदास गावडे, स्मिता कुलकर्णी, अतुल राऊत,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे,अमोल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. अमृता देवगावकर यांनी प्रास्ताविक, सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत तर स्वप्नशिल्प सोसायटी चे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी आभार प्रदर्शन मानले.



