पुणे मेट्रोचे ट्रेन कोच मुंबईत दाखल !

पुणे : पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा (Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली असून प्रत्येक ट्रेनमध्ये ३ कोच असणार आहेत. टिटागढ फिरेमा ही कंपनी १०२ कोच आपल्या पुणे मेट्रोसाठी तयार करुन पुरवठा करणार आहेत. मेट्रोशी झालेल्या करारानुसार पहिल्या काही ट्रेन ह्या टिटागढ़ फिरेमाच्या इटली येथील कारखान्यामध्ये तयार होणार आहेत आणि उर्वरित ट्रेन कोलकाता येथे तयार होणार आहेत. आज इटलीत तयार झालेली पहिली ट्रेन (३ कोच असलेली) मुंबई बंदरात दाखल झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या टिटागढ फिरेमा कंपनीच्या कोच या अल्युमिनियम धातूपासून बनविण्यात आल्या आहेत. त्या वजनाने हलक्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होणार आहे. तसेच त्यांना कमी देखभालीची गरज पडणार आहे. एका कोचची लांबी २९ मी. असणार आहे. तसेच कोचची उंची ११.३० मी. असणार आहे.




