लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असे प्रकल्प करतात, त्यावेळी लोकांसमोर जाताना आम्हालाही अभिमान वाटतो : सुप्रिया सुळे

कर्वेनगर : कर्वेनगर मधील भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल ही शाळा देशातील व राज्यातील सरकारी अव्वल शाळांपैकी एक आहे. या शाळेमध्ये वारजे कर्वेनगर परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी ज्या वेळेस असे प्रकल्प करतात त्या वेळी लोकांसमोर जाताना आम्हालाही अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या प्रयत्नातून व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल तसेच पुस्तकघर या उपक्रमाला सुळे यांनी भेट दिली. त्यानंतर दुधाने यांच्या कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे, नगरसेवक सचिन दोडके माजी नगरसेवक बाबा धुमाळ व पदाधिकारी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या लर्निंग स्कुलमध्ये लवकरच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सूरू होत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील भविष्याचा वेध घेऊन लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू केलेले हे “ई-लर्निंग स्कुल” कौतुकास्पद व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे.
प्रशस्त वर्ग, क्रीडांगण, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे हे ई-लार्निंग स्कुल बघून आनंद वाटला. महानगरपालिकेच्या माध्यमातून ही शाळा उभारून नागरिकांसाठी उत्तम सुविधा सुरू केल्याबद्दल लक्ष्मी दुधाने, स्वप्निल दुधाने यांचे सुळे यांनी अभिनंदन केले.



