अपयश झाकण्यासाठी भाजपकडून पाण्याचे राजकारण : दिपाली धुमाळ यांचा आरोप

पुणे : सत्तेत राहून पुणे शहरासाठी कोणतीही ठोस कामे करता आली नाहीत तेच अपयश झाकण्यासाठी आता भाजपकडून पाण्याचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
पुणे शहराला जेवढे पाणी लागते तेवढा पाणीपुरवठा पाणीपुरवठा पाटबंधारे खात्याकडून होणारच आहे.
सध्या महापालिका दरवर्षी १८.५० टीएमसी पाणी वापरत आहे. गेल्यावर्षीपासून भामा आसखेड धरणातील २.६७ टीएमसी पाणी पुणे शहराला उपलब्ध झाले, त्यामुळे तेवढाच पाणी वापर खडकवासला धरणातून कमी करावा. अशी पाटबंधारे विभागाची भूमिका आहे. पण त्यावर कोणता निर्णय झालेला नसताना राजकारण केले जात असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात याबाबत बैठक होणार आहे. आज सायंकाळी आम्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व काही पदाधिकारी पाटबंधारे अधिकाऱ्यांना भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले आहे. पाणी कपाती बाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.




