राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ” चित्र-शिल्प संवाद “

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र-शिल्प संवाद कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे दिनांक ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, दीवा प्रतिष्ठानचे करण मानकर उपस्थित होते. मानकर म्हणाले, भारताच्या कलेला इतिहास आहे. भीमबेटका, बाघ, अजंठा याठिकाणची गुहाचित्रे तर वेरूळ, कोणार्क, सांची येथील वास्तुकला याची साक्ष देतात. ही चित्र-शिल्पे सुयोग्य माध्यमात निर्माण झाली. त्यामुळे ती काळाच्या ओघात आजही टिकून आहेत. परंतु त्यापूर्वीपासून या कला मानवाच्या जीवनाला समृद्ध करुन गेल्या. मात्र त्यांची माध्यमे थोडी तकलादू असल्याने त्या नष्ट झाल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी राजे महाराजे कलेला व कलाकारांना राजाश्रय देत असत; अगदी राजर्षि शाहू महाराज यांनी देखील आबालाल रेहमान वगैरे अनेक कलाकारांना राजाश्रय दिला. त्यानंतरच्या काळात आदरणीय शरद पवार साहेबांनी सर्वच कलाकारांना राजाश्रय दिला. चित्रकार आणि शिल्पकार यांच्यासाठी मुंबई येथे बॉम्बे आर्ट सोसायटीला जागा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातील चित्रकार आणि शिल्पकारांना प्रत्येकी १ लाख रु प्रदान करुन त्यांचा गौरव केला. आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही चित्र आणि शिल्पकलेची कार्यशाळा व भव्य कला प्रदर्शन आयोजित करीत आहोत.
सदर कला प्रदर्शन व चित्र-शिल्प कलाशिबिर पुण्यातील बालगंधर्व कला दालन त्याचप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या मागील बाजूस कॅफेटेरिया येथे दिनांक ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कलाकारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून या कलाप्रदर्शन व कलाशिबिरासाठी कलाकारांना कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. अशी माहिती संयोजक व माजी उपमहापौर , नगरसेवक दीपक माधवराव मानकर यांनी सांगितले.




