लकडी पुलावरील मेट्रोचे काम आहे त्या परिस्थितीत सुरु होणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील (लकडी पूल)मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी सुचवलेला पर्याय शक्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून मेट्रोने सुचवलेले पर्याय पुणेकरांसाठी व्यवहार्य नाहीत. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात मंडळांचा पर्याय तांत्रिक शक्य नव्हता आणि मेट्रोचे दोन्ही पर्याय पुणेकरांसाठी व्यवहार्य नव्हते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
मोहोळ म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून आपण गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन महिन्यात अनेक बैठका घेतल्या, चर्चा केल्या.
विकासकामे करताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव कार्यकर्ता आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. म्हणूनच काळानुरूप बदलत, परंपरा जपत आपल्या गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली.

शहर विकासाच्या मुद्द्यावरही गणेशोत्सव कार्यकर्ते विकासाला पाठिंबा देतील हा विश्वास आहे.गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायाचा देशभरात प्रयोग कुठेही झालेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर बदलणे हाही होता. त्यासाठी दीड वर्ष आणि २३ कोटीचा अतिरिक्त खर्च होणार होता.
त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात मंडळांचा पर्याय तांत्रिक शक्य नव्हता आणि मेट्रोचे दोन्ही पर्याय पुणेकरांसाठी व्यवहार्य नव्हते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला. असे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.






