पुणे शहर
कर्वेनगरमध्ये मुख्य रस्त्यावर झाडाची मोठी फांदी कोसळली आणि..

कर्वेनगर : कर्वेनगर येथे मुख्य एनडीए रस्त्यावर झाडाची मोठी फांदी पडल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही. रस्त्यावर मोठी फांदी पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
कर्वेनगर मधील काकडे सिटीसमोर असणाऱ्या सुझुकी शो रूमसमोर उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. या मुख्य एनडीए रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालू असते. परंतु सकाळच्या वेळेत वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून रस्त्यावर पडलेली मोठी फांदी कट करून बाजूला केली व रस्ता वाहतुकीला मोकळा केला.










