मास्क पासून बनवलेला आकाश कंदील वेधतोय सर्वांचे लक्ष

पुणे : कोरोना सारख्या महामारीच्या काळात नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. आता लॉकडाऊन संपल्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम ही पाळावेत म्हणून प्रबोधन करण्यासाठी रवींद्र हुले व त्यांच्या मित्र परिवाराने ३५१ मास्क पासून बनवलेला ५ बाय ५ फुटाचा आकाश कंदील बनविला असून हा आकाश कंदील स्वारगेट येथील जेधे चौकात लावला आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे आणि दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेमध्ये गर्दी वाढली आहे. या गडबडीत नागरिकांना करोना सारख्या महामारी सारख्या रोगाचा विसर पडू नये. यासाठी या मास्क पासून बनवलेला आकाश कंदील तयार केला असून सुरक्षित अंतर राखत व नियमांचे पालन करत दिवाळी साजरी करूयात असा संदेश त्याद्वारे देण्यात आला आहे.



स्वारगेट परिसरात हा मास्कचा आकाश कंदील नागरिकांचे लक्ष वेधत असून नागरिकांमध्ये देखील याची चर्चा होत आहे. रवींद्र हुले म्हणाले की, नागरिकांनी घाबरू नये, मात्र सुरक्षेची काळजी घेऊनच दिवाळी साजरी करावी. हा समाजहिताचा संदेश देण्याचा आकाश कंदील च्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.


















