काय म्हणाले राज्यपाल मराठा आरक्षणा संदर्भात..

मराठा आरक्षणाच्या संदर्भात विनायक मेटे यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई :- राज्य सरकारकडून मशाल मार्चवेळी दिली गेलेली आश्वासने निर्धारित वेळेत पूर्ण केली गेली नाहीत. मराठा आरक्षणा बाबत व समाजाच्या प्रश्नांबाबतचा राज्य सरकारकडून हलगर्जीपणा सुरू असल्याने शिवसंग्राम संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
यावेळी राज्यपालांनी मराठा समाजाच्या मागण्या गंभीरपणे ऐकून घेत, राज्य सरकारला योग्य सूचना करण्याचे आश्वासन दिले व मराठा समाजाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी शिवसंग्राम-महायुतीच्या आमदार भारती लव्हेकर, अॅड. श्रीराम पिंगळे व मराठा क्रांती मोर्च्याचे विविध जिल्ह्यातील समन्वयकांची उपस्थिती होती.

यावेळी शिवसंग्राम शिष्टमंडळाने अशोक चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरिता स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करणे व नवीन समिती नियुक्त करणे, विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठ स्थापन करणे, घटनापीठासमोर अंतरिम स्थगिती उठवण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांच्या (ईड्ब्लूएस) चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, राज्यातील मेडिकल प्रवेशामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ देऊन न्याय द्यावा, इयत्ता ११ वीचे अर्धवट राहिलेले प्रवेश पूर्ण करण्यात यावेत, २०१४ मधील ईएसबीसी व २०१९ – २० मधील ईएसबीसी मधील भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नियुक्तीपत्र देऊन समाविष्ट करावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलावीत अशा मागण्या राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.



“आम्ही आपणाकडे मोठ्या आशेने आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न घेऊन आलो आहोत. आघाडी सरकार मराठा समाजाला न्याय देईल असे वाटत नाही. म्हणून आपणच पुढाकार घेऊन मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली. वैद्यकीय प्रवेश घेण्यास फक्त २ दिवस राहिले आहेत. समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरेल आणि त्याचे पडसाद सर्व राज्यात उमटतील व त्याची जबाबदारी आघाडी सरकारची राहील, या दृष्टीने आपण शासनाला आदेश द्यावेत अशी विनंतीही माननीय राज्यपाल महोदयांना आ विनायक मेटे व शिष्टमंडळाने या भेटीवेळी केली.



मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बी. बी. जाधव, शिवसंग्रामचे विक्रांत आंब्रे, सत्यवान राऊत, अनुश्री माळगावकर, किशोर चव्हाण, भरत लगड, अमित जाधव, अविनाश सावंत, पुंडलिक मालुसरे, योगेश विचारे, गणेश घोसाळकर, सलीम पटेल आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यावेळी उपस्थित होते.












