महिलांना मारहाण आणि अर्वाच्य भाषा..कोथरूड पोलिसांवर आरोप ; सुप्रिया सुळे यांची चौकशीची मागणी..

पुणे : पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आणि मारहाण केली तसेच पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप केला गेला असून त्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पीडित महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ती नोंदवली नाही.एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या महिलांनी पोलिसांनी पदाचा गैरवापर, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे.

या महिलांच्या आरोपानुसार, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये त्यांना वेगळ्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्या. महिला सहायक पोलिस निरीक्षक आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप या महिलांनी केला आहे. “तू महार-मांगाची आहेस म्हणून असे वागते का?”, तसेच इतर अपमानास्पद भाषा वापरण्यात आली असल्याचे म्हंटले आहे. पाच तास रिमांड रूममध्ये ठेवण्यात आले. या काळात त्यांचे मोबाईल जप्त करून पासवर्डही बदलण्यात आले, असा दावा या महिलांनी केला आहे.



पतीच्या त्रासाला कंटाळून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक २३ वर्षीय विवाहित महिला पुण्यात आली होती. या महिलेला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्या पुढे आल्या. त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं. तसेच स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य विकास कोर्ससाठीही मदत केली. त्या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे पोलिसांची मदत घेतली. कोणत्याही वॉरंटशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय, कोथरूड पोलिसांनी आम्हा तीन महिलांच्या घरी छापा टाकला. यानंतर आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेलं.
या महिलांनी केलेले आरोप पोलिसांनी आरोप फेटाळले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेची मिसिंगची तक्रार होती. त्या तपासात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सहकार्य केले. महिलांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ किंवा मारहाण करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे ट्वीट सुप्रिया सुळेंनी केले आहे.



