आदर पूनावाला संस्थेकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला ‘स्वच्छता बिन्स’

“स्वच्छतेचे महत्त्वपूर्ण काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सेवकांना पोलीस खात्याचा “सलाम”- वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव
पुणे : “समाजाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आदर पूनावाला संस्थेच्या वतीने शहर स्वच्छतेचे महत्त्वपूर्ण काम प्रामाणिकपणे करणाऱ्या स्वच्छता दूतांचा अभिमान वाटतो. स्वच्छतादूतांच्या या कार्याला पोलीस खात्याच्या वतीने “सलाम” अशा शब्दात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी स्वच्छता दूतांचे कौतुक केले. निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या पुढाकाराने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आदर पूनावाला क्लीन सिटी मार्फत कचरा व्यवस्थापन करीता चार “लिटर पिकर बीन्स” देण्यात आले.

या प्रसंगी पुणे महापालिकेचे माजी सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, आदर पूनावाला क्लीन सिटीचे सीओओ मल्हार करवंदे सर, प्रकल्प व्यवस्थापक फारूक बांगी, निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष निखिल गायकवाड, फिल्ड ऑफीसर महादेव खलसे, सुपरवायजर निखिल पायघन व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. निर्भय प्रतिष्ठानच्या वतीने आदर पूनावाला संस्थेला विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बिन उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली होती. संस्थेकडून देखील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता राखण्यात मदत व्हावी यासाठी तात्काळ हे लिटर बिन उपलब्ध करून देण्यात आले.
संस्थेचे सीईओ मल्हार करवंदे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. आदर पूनावाला क्लीन सिटीच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होत असून नागरिकांनी स्वच्छतेच्या कामासाठी पुढाकार घ्यावा असे मत माजी सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी व्यक्त केले. आदर पूनावाला क्लीन सिटी यांच्यावतीने स्वच्छतेसह इतरही सामाजिक उपक्रमांमध्ये संस्थेच्या वतीने सहकार्य करावे अशी विनंती या निमित्ताने निर्भय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड यांनी केली. यावेळी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार तसेच आदर पुनावाला संस्थेचे स्वच्छता सेवक उपस्थित होते.






