किरण दगडे पाटील आयोजित काशी विश्वनाथ यात्रेवरून आलेल्या भाविकांचे जल्लोषात स्वागत..

पुणे : नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत काशी विश्वनाथ दर्शन यात्रेत काशीला गेलेले प्रभागातील सर्व २५०० भाविक यात्रेवरून सुखरूप पुण्यनगरीत परतले. या यात्रेकरू भाविकांचे खडकी रेल्वे स्टेशन येथे वाद्याच्या गजरात आणि फुलांची उधळण करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने प्रभागातील २५०० भाविक नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन यात्रेस नेण्यात आले होते. यासाठी एक विशेष ट्रेन त्यांच्याकडून बुक करण्यात आली होती. २५ फेब्रुवारी रोजी या यात्रेस पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशन वरून प्रारंभ झाला होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात करण्यात आली होती. २५ फेब्रुवारीला गेलेले भाविक १ मार्च रोजी यात्रा पूर्ण करून पुण्यात दाखल झाले.
या यात्रेत भाविकांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी किरण दगडे पाटील यांच्याकडून घेण्यात आली होती. यात्रेस आलेल्या जेष्ठ नागरिकांची विशेष खबरदारी घेण्यात येत होती. प्रवासादरम्यान रेल्वेत वेळेवरती भाविकांना खास जेवण, नाष्टा चहा व फलहाराची व्यवस्था करण्यात आली होती. डॉक्टरांची एक टीम ही भाविकांची काळजी घेण्यासाठी ट्रेन मध्ये होती.
यात्रा पूर्ण करून पुण्यात दाखल झाल्यानंतर भाविकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रा पूर्ण झाल्याने व मनो भावे काशी विश्वनाथाचे दर्शन झाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते. यात्रा सुरक्षित व केलेल्या नियोजनानुसार भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली असून यात्रेतील भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान मिळाल्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा दगडे पाटील यांनी सांगितले.
