चंद्रकांतदादा तुम्ही उद्या निवडणूक जिंकालही, पण अशा कार्यकर्त्यांच्या बेजबाबदार वागण्याचं करायचं काय..

पुणे : विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी लागत आह. मात्र निकाल लागण्याआधीच नेत्यांच्या विजयाचे बॅनर काही उत्साही कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्याचे चित्र पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक मतदार संघात दिसत आहे. तसाच प्रकार पुण्यातील कोथरूड मतदार संघात ही पाहिला मिळत असून बॅनर लावताना भाजप कार्यकर्त्यांनी केलेली मनमानी सध्या कोथरूड मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
कोथरूड मधील कर्वे पुतळा चौक परिसरात कोथरूड मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर काही कार्यकर्त्यांनी निकाल लागण्या आधीच लावले आहेत. मात्र हे बॅनर लावताना त्याचा त्रास नागरिकांना, वाहतुकीला होऊ शकतो याचा विसर कार्यकर्त्यांना पडलेला दिसत आहे.
कर्वे पुतळा चौक परिसरात पहाड उभा करून बॅनर असा लावला आहे की, तो आर्धा पदपथावर आहे तर आर्ध्या बॅनर ने रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. भर कर्वे रस्त्यावर लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे चर्चा सुरू झाली आहे. असे बॅनर कोथरूड मध्ये निकला याआधी कधीच लावले गेले नव्हते, यंदा ते लावले गेल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रकांत पाटील तुम्ही उद्या निवडणूक जिंकालही पण अशा कार्यकर्त्यांच्या बेजबाबदार वागण्याचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उद्या निवडणूक कोणीही जिंकले पण अशा पद्धतीने लावल्या जाणाऱ्या बॅनरमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार असेल तर नेत्यांनी अशा कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असणार आहे.










