अजित पवारांची मोठी घोषणा…

मुंबई : राज्यातील मालमत्ताकरांच्या थकबाकीदारांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. मालमत्ता कर थकल्यास राज्यातील महानगरपालिका वर्षाला तब्बल 24 टक्के इतके प्रचंड व्याज सामान्य नागरिकांकडून आकारत आहेत. काल ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगण्यात आली. यासंदर्भात पवार यांनी तात्काळ आपल्या सचिवांशी बोलणे करून व्याज दर 24 टक्क्यांऐवजी 12 टक्के व्याज करण्यासाठी कॅबिनेट नोट सादर करण्यास सांगितलं. या प्रस्तावावर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते बसून योग्य निर्णय घेऊन तसे निर्देश सर्व महापालिकांना दिले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयानंतर राज्यातील मालमत्ताकराच्या थकबाकीदारांची सावकारी करातून सुटका होणार आहे.







येत्या काही महिन्यात मुंबई महानगर पालिकाबरोबर नवी मुंबई , औरंगाबाद, कल्याण डोंबिवली , वसईविरार, कोल्हापूर आदी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र या निवडणूका शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस महाविकास आघाडी करून लढविण्याबाबत कोणताही निर्णय अजून तरी झालेला नाही. त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्या नंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.







































