“आंबेडकरी चळवळीच्या पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरेल असा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास करावा” – शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मत

पुणे – ” आपल्या पुढच्या तीन पिढ्यांच्या निवाऱ्याची नियोजनबद्ध व्यवस्था करणाऱ्या त्या काळातील आंबेडकरी चळवळीच्या जाणकार कार्यकर्त्यांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. त्यांचा आदर्श आणि शिकवण कायम स्मरणात ठेवून पुढील पिढ्यांनी स्वतःचा आणि समाजाचा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास करावा असे मत, ज्येष्ठ विचारवंत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
पुणे शहरातील येरवडा येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, ॲम्युनिशन फॅक्टरीचे मुख्य महाव्यवस्थापक संजय हजारी, महाव्यवस्थापक के. के. मौर्या, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, माजी आमदार जगदीश मुळीक,माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अविनाश साळवे,संजय भोसले, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, शितलताई सावंत, काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रियंका रणपिसे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, सामाजिक कार्यकर्ते निलेश जठार,मंगेश गोळे,निखिल गायकवाड, रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम, सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष संदेश शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहराच्या लौकिकात भर पाडणाऱ्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीच्या स्थापनेत कर्मवीर भाऊराव पाटील, दादासाहेब गायकवाड, न्यायमूर्ती आर. आर. भोळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे योगदान लाभलेले असून सोसायटीतील मान्यवर सभासदांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी आवर्जून नमूद केले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमांना तसेच सोसायटीचे संस्थापक चिफप्रमोटर दलित मित्र एम. ए. जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण सोसायटीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली. राज्य शासन तसेच महापालिका प्रशासनाकडील सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी कायम सहकार्य करू असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्था विभागाच्या वतीने भविष्यातील योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सुहास पटवर्धन यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या.
सोसायटीचे संस्थापक एम.ए. जाधव यांच्या कुटुंबीयांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रकाश नाईक यांनी केले आभार विलास कांबळे यांनी मानले. यावेळी सोसायटीच्या स्थापनेपासूनच्या काळातील महत्त्वपूर्ण अशा घटनांच्या ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अमृत महोत्सवी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटी ट्रस्ट संचालक मंडळ, सिद्धार्थ मंडळ व रमामाता महिला मंडळ याचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी परिश्रम घेतले.