वेदनाशामक औषधे आणि किडनीचे आजार..जागतिक किडनी दिवसाच्या निमित्ताने विशेष लेख

डॉ. सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ
मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. ह्या अवयवाबाबतीत त्याचे कार्य, त्याचे आजार, उपचार, घ्यावयाची काळजी या बाबत जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस किडनी दिवस World Kidney Day म्हणून साजरा केला जातो.
किडनी निकामी होणे, किडनी मध्ये खडे होणे, किडनीवर सुज येणे, किडनीचा कर्करोग होणे, किडनीचे काम मंदावने अथवा जास्त प्रमाणात होणे असे असंख्य प्रकारचे आजार किडनी मध्ये आढळून येतात. किडनीचे काम मंदावले तरी शरिरातील इतर अवयव पण हळूहळू निकामी होण्याची शक्यता असते. मधूमेह, उच्चरक्तदाब, आनुवंशिक आजार ह्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. पण सततची वेदनाशामक औषधे पण किडनी निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

बहूतांश लोक अंगदुखी, पाठ, मान, कंबर, सांधेदुखी, गुडघेदुखी साठी डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर वेदनाशामक औषधे, स्टिरॉइड ची औषधे विकत घेऊन बरीच दिवस महिने वर्षे खातात. त्यांना अशी औषधे खण्याची सवयच लागलेली असते. सततच्या वेदनाशामक औषधांमुळे कदाचित शारीरिक दुखणं कमी अथवा बंद होईल पण त्याचा विपरीत परिणाम कालांतराने किडनी निकामी होण्यास होतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.



कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला सतत आणि बरीच दिवस जर वेदनाशामक औषधे, स्टिरॉइडची औषधे घ्यावी लागत असतील तर आपली संपूर्ण शारीरिक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आजाराचे निदान केले पाहिजे. गरजेनुसार ऑपरेशन करून घ्यावे पण सततची वेदनाशामक औषधे स्टिरॉइडची औषधे घेणे टाळले पाहिजे.
जर आपल्याला मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, संधिवात, फिट्सचा आजार, हृदयाचा आजार व इतर कोणत्याही आजारांसाठी बरेच दिवस महिने वर्षे औषध घ्यावी लागत असतील तर नियमित शरिरातील तपासणी वैद्यकीय सल्ला घेऊन केली पाहिजे. रक्त तपासणी करून किडणीचे कार्य कसे सुरू आहे ते तपासले पाहिजे.
वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय स्कॅन, पेट स्कॅन करून घेतला पाहिजे. शारिरातील टाकावू पदार्थ, द्रव्य, शरिराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत किडनीचा सहभाग खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. चला तर मग आज किडनी दिनी किडनी बाबत जागरूकता तयार करूयात. जी किडनी आपले शरीर स्वच्छ ठेवते आपण तिची काळजी घेऊयात..






