आरोग्य

महिलांमधील रक्तक्षय/पंडूरोग आजार एक गंभीर समस्या : डाॅ.कांचन कोठावदे

कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. योग्य वेळी निदान करून उपचार केले तर शरीराला होणार त्रास कमी होतो हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

रक्तक्षय….पंडूरोग…..ॲनेमिया….
मानवी शरिरातील कमी होणारे रक्ताचे प्रमाण, कमी असलेले रक्तातील हिमोग्लोबीन चे प्रमाण म्हणजे रक्तक्षय किंवा पंडूरोग. आज जगभरातील महिलांमध्ये कमी हिमोग्लोबीन रक्तक्षय हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भारतासारख्या विकसनशील देशात तर हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहे.  घरकाम करणारी स्त्री असो अथवा शेतात काम करणारी बाई ते अधिकारी पदावर काम करणारी अथवा आयटी क्षेत्रात काम करणारी महिला असूदेत कमी हिमोग्लोबीन असण्याचे प्रमाण सर्व स्तरावर काम करणाऱ्या महिलांमध्ये आढळून येते.

साधारणपणे शालेय शिक्षण घेत असणाऱ्या ४० ते ५० टक्के मुलींमध्ये कमी हिमोग्लोबीन आढळून येते. तसे वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहेत. साधारणपणे लग्न झाल्यानंतर प्रसूतीनंतर हिमोग्लोबीन कमी होण्याचे प्रमाण पण खूप जास्त आहे. हिमोग्लोबीन म्हणजे हिम म्हणजे लोह तर ग्लोबीन म्हणजे प्रथिने प्रोटीन.

रक्तक्षयाची कारणे..
लोहयुक्त व सकस आहाराची कमतरता.
मानसिक तणावपूर्ण जीवन.
शरीराकडे होणारे दुर्लक्ष.
मासीक पाळीतील रक्तस्त्राव.
जास्त झालेली बाळांतपणे (२ पेक्षा जास्त ).
मासिक पाळी दरम्यान होणारा जास्त प्रमाणातील रक्तस्राव.
कमी कालावधीत परत परत येणारी मासिक पाळी.
कोणत्याही कारणांमुळे का असेना पण सतत होणारा गर्भपात होणे.

काही वैद्यकीय आजार जसे की..
मलेरिया/ डेंगू/ जंत होणे/मुळव्याध असणे ह्या आजारात पण हिमोग्लोबीन कमी होणे दिसून येते.
काही कर्करोग रोगाचे आजार..
जन्मतःच हिमोग्लोबीन तयार होणे कमी असणे अशी बरीच कारणे आहेत.

रक्तक्षयाची लक्षणे..
आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे शरिराचा रंग पांढरट पंडूरंगाचा होतो,चक्कर येणे,भूक मंदावणे, चालताना, जीना चढ उतार करताना दम/धाप लागणे, थोडे श्रम/ काम केले तरी थकवा जाणवणे, निरुत्साह वाढत जाणे,चिडचिडेपणा वाढणे,  हातपायाला मुंग्या येणे.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

उपचार
सकस आहार घेणे हाच प्रमुख हिमोग्लोबीन वाढण्यासाठी आवश्यक उपचार आहे.
लोह वाढवणारे पदार्थखाणे जसे की..
हिरव्या पालेभाज्या, खजूर, सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, ओट्स, गूळ, काळ्या मनुका, जर्दाळू, तीळ, चणे, उडीद, लाल भोपळा, मध, बीट, मटार, टमाटा, डार्क चॉकोलेट, शेंगवर्गीय भाज्या, मासे, सोयाबीन, पालक, मटार, भेंडी, मका, गाजर, पालेभाज्या, केळी, डाळिंब, कलिंगड, पेरू, पपई, संत्रे, शेंगदाणे, बदाम, जवस, कडधान्ये, अंडी, गाईचे दूध, दही, चीज, पनीर, टोफू, कोरफड, काही प्राण्यांचे मांस.

प्रथिने वाढवणारे पदार्थ.
सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबिन, शेंगदाणे, काजू, बदाम, हिरव्या पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या, गहू, तांदूळ, कडधान्ये, लोणी, दूध, दही, तीळ अंडी, चिकन, मका.

वैद्यकीय उपचार औषधे
हिमोग्लोबीन वाढवणारी औषधे घेतलेली तर ही औषधे हिमोग्लोबीन ची कमतरता भरून काढतात.
काही वेळा जर तोंडावाटे घेतलेल्या औषधांमुळे जर हिमोग्लोबीन वाढत नसेल तर बर्‍याच रूग्णांना  हिमोग्लोबीन व जीवनसत्त्वाची मात्रा वाढवणारे इंजेक्शने दिले जाते.

काही रुग्णांमध्ये हिमोग्लोबीन ची खूप कमतरता असते. अश्या वेळेस मात्र औषधोपचार फारसा उपयोगी पडत नाही. मग अश्या रूग्णांना बाहेरून सलाईन द्वारे रक्त दिले जाते. काही रूग्णांना काही आजारामुळे किंवा कर्करोगामुळे जर रक्तक्षय असेल तर अश्या रूग्णांना
बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात येते. यात स्टेमसेल्स दिल्या जातात. हिमॅटोलॉजिस्टच्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने हा निर्णय घेतला जातो.

एखाद्या अपघातामुळे, शस्त्रक्रियेदरम्यान जर खूप प्रमाणात रक्तस्राव झाला तरी सुद्धा हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी होऊ शकते ते औषधोपचार करून भरून काढता येते.

आज आपण स्त्री शक्ती ही खरी शक्ती आहे व त्या साठीच
आपली आई, बहिण, बायको,मावशी,काकू, आजी,मुलगी, आपल्या घरी काम करणारी ताई/मावशी, मामी,आत्या..सर्व जणांची हिमोग्लोबीन तपासणी करावी व रक्तक्षयाचे निदान झालेच तर लवकरात लवकर उपचार सुरू करावेत.

डाॅ.कांचन कोठावदे
डाॅ.सतेज कोठावदे
बावधन, पुणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये