महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच : आता १४ फेब्रुवारीपासून होणार सलग सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांनी दिली आहे. आज सत्तासंघर्षात काही निकाल येणार की फक्त घटना पीठ बदललं जाणार याची उत्सुकता होती. मात्र पुढील सुनावणी आता १४ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे.
सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी झाली. ठाकरे गटाने नबम रेबिया प्रकरणाचा दाखला देत हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडे सोपवले जावे, अशी मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात आज काय युक्तिवाद होणार आणि काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांचा युक्तिवाद झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात पुढची तारीख दिली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा केला होता. परंतु, आता पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या मध्यावर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता फारच कमी आहे.









