प्रभाग 30 कर्वेनगर होम कॉलनी मध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग.. अंतिम उमेदवारी नंतर लढत होणार स्पष्ट

मोदी लाटेतही 2017 ला आघाडीला झाले होते उल्लेखनीय मतदान.
अमोल साबळे
पुणे महापालिकीचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होईल. या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षणे जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभागातील इच्छुक उमेदवार कोणत्या गटातून निवडणूक लढवायची आहे याची चाचपणी करून तयारीला लागलेला आहे. कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभाग क्रमांक 30 मध्ये राजकीय डावपेच आखले जात असून पक्षांतर्गत व पक्ष विरोधी प्रतिस्पर्ध्याला कसं नामोहरम करायचं याची रणनीती प्रत्येक जण तयार करताना दिसत आहे. पडद्यामागे अनेक घटना घडत असून त्याची चर्चा रंगताना दिसत आहे. पक्षांतराच्या चर्चा ही जोरात सुरू आहेत. अद्यापपर्यंत युती आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी इच्छुक उमेदवार मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
आपला पॅनल चांगला व्हावा यासाठी मातब्बर काय खेळी खेळत आहेत आणि कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज लावत उमेदवारीसाठी इच्छुक असणारा कार्यकर्ता वाटचाला करत आहे. प्रभाग या क्रमांक 30 कर्वेनगर मध्ये अ) OBC, ब)सर्वसाधारण महिला, क) सर्वसाधारण महिला आणि ड) सर्वसाधारण असं आरक्षण जाहीर झालेलं आहे. 2017 च्या आरक्षणाप्रमाणेच हे आरक्षण पडले आहे. त्यामुळे 2017 ला जे नगरसेवक निवडून आले होते ते पुन्हा त्याच गटातून निवडणूक लढवतील असे वाटत असताना काही माजी नगरसेवकांनी आपले गट वेगळे जाहीर केल्याने पुढे जाऊन निवडणुकीचे चित्र काय असणार आहे हे स्पष्ट होत आहे. 2017 ला झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी दुधाने निवडून आल्या होत्या म्हणजे भाजपचे ३ व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक असे पक्षीय बलाबाल होते. मोदी लाटेतही आघाडीच्या उमेदवारांना या प्रभागात चांगली मते मिळाली होती.

2017 च्या महापालिका निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली…
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अ गटासाठी नागरिकांचा मागास हे आरक्षण होते या गटात भाजपचे सुशील मेंगडे 16 हजार 835 मते मिळवत विजयी झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मोहिते हे 8 हजार 612 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते. तर शिवसेनेचे सचिन थोरात यांना 3916, मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संजय नांगरे यांना 3713 मते मिळाली होती.
सर्वसाधारण जागेसाठी ब गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लक्ष्मी दुधाने यांना 14,942 मते मिळाली होती. त्या विजयी झाल्या होत्या. भाजपच्या रोहिणी भोसले यांना 14,361 ही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. क गटामधून भाजपच्या वृषाली चौधरी 15543 मध्ये मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रेश्मा बराटे यांना 10842 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. शिवसेनेच्या वैशाली दिघे यांना 3256 तर मनसेच्या सुरेखा मकवान यांना 2737 मते मिळाली होती.
ड गटातून भाजपचे राजाभाऊ बराटे 17060 मते मिळवून विजयी झाले होते तर काँग्रेस पक्षाचे विजय खळदकर यांना 9713 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मनसेच्या कैलास दांगट यांना 3541 शिवसेनेच्या मयूर वांजळे यांना 2763 मते मिळाली होती.



2017 च्या महापालिका निवडणुकीत मोदी लाट असतानाही आघाडीच्या उमेदवारांना मिळालेले मतदान उल्लेखनीय होते. त्यामुळे या प्रभागाला केवळ भाजपचे वर्चस्व असणारा प्रभाग असे म्हणता येणार नाही. या प्रभागाचा भौगोलिक विचार केला तर कर्वेनगर गावठाण, वडार वस्ती, हिंगणे होम कॉलनी, आकाशनगर, इंगळेनगर, मातोश्री कॉलनी, शाहू कॉलनी, कॅनॉल वरील गल्ल्या, मावळेआळी, श्रीमान सोसायटी, वेदांत कॉलनी, कुलश्री सोसायटी, सहवास सोसायटी असा संमिश्र भाग येतो. त्यामुळे भाजपला फॉर असणारा हा प्रभाग आहे असे म्हणता येणार नाही. सोसायट्या, बैठी घरे असलेल्या वसाहती, आणि वस्ती विभाग समाविष्ट असलेल्या या प्रभागात वैयक्तिक जनसंपर्क, केलेली कामे, आणि पक्षाला मानणारा वर्ग यात जमेची बाजू ठरणारे उमेदवार बाजी मारू शकतील.
युती आणि आघाडीचे चित्र अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे दोन भाग झाले आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा आहे. मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का ? आणि काँग्रेस काय भूमिका घेणार या सर्व गोष्टी येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होतील. महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हंटले असले तरी अधिकृत काही जाहीर झालेले नाही. त्यामुळे या पुढे घडणाऱ्या राजकीय समीकरणातून पुढील चित्र स्पष्ट होईल.
सध्या मात्र या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यांच्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास या प्रभागात भाजपसमोर मोठे आव्हान उभे असेल. काँग्रेसला मानणारा मतदार ही या प्रभागात आहे. 2017 ला झालेल्या निवडणुकांनंतर आज 2025 पर्यंत म्हणजे साधारण 8 वर्षाच्या कालावधीत बऱ्याच राजकीय, सामाजिक घडामोडी घडलेल्या आहेत. त्या परिणामांचा विचारही करावा लागणार आहे. भाजप पक्षात इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर उमेदवारी नाही मिळाल्यास इच्छुक कार्यकर्ते इतर पक्षाचा पर्याय निवडू शकतात. त्यात दोन्ही शिवसेना, मनसे यांनाही तगडे उमेदवार मिळू शकतात त्यामुळे लढतीचे खरे चित्र उमेदवारी वाटपानंतरच स्पष्ट होईल.
या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार
भाजप : राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, विनोद मोहिते, विठ्ठल बराटे, महेश पवळे, वृषाली चौधरी, एकता रामदासी, मानसी गुंड
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार): लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, ॲड. नीता शिंदे, प्रमोद शिंदे, पल्लवी शेडगे, विष्णुपंत सरगर, सुनीता सरगर,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार : तेजल दुधाने, संगीता बराटे, आनंद तांबे, मोहित बराटे
मनसे : शैलेश जोशी, सचिन विप्र, अशोक कदम, आनंद पाटील
काँग्रेस : शारदा वीर, योगेश नायडू, बालाजी शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिनेश बराटे, वैशाली दिघे, नंदू घाटे, अजय भुवड
शिवसेना : सचिन थोरात, प्रतीक्षा जावळकर,
तसेच विजय खळदकर, संतोष बराटे, चेतन भालेकर, विरेश शितोळे यांच्याकडूनही निवडणुकीची तयारी सुरू असून ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार याबाबतची त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.






