‘म्युकरमायकोसिस’ आजारावरील उपचारासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय..

पुणे : कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस या दुर्मिळ आजाराने डोके वर काढले असून या आजाराचे रुग्ण आता आढळून येत आहेत. या आजारावरील उपचार महागडे असल्याने सामान्य रुग्णाला ते परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश आता शहरी गरीब योजनेत करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Big decision of Pune Municipal Corporation for the treatment of ‘Mukarmycosis’ disease
म्युकरमायकोसिस या आजाराबाबत पुणे महानगरपालिकेच्या करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती देताना मोहोळ यांनी सांगितले आहे की, आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना राखीव ठेवण्यात आले आहे. उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन सज्जताही ठेवण्यात येत आहे. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे.
कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिस बाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक असल्याचे मोहोळ यांनी म्हंटले आहे.









