महापालिकेतील अमित शाह यांच्या कार्यक्रमाला विरोधकांनी येऊ नये म्हणून भाजपचे ऐनवेळेस गलिच्छ राजकारण : दिपाली धुमाळ

पुणे : आज महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आवारात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाचे भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत असताना विरोधकांनी कार्यक्रमास उपस्थित राहू नये असे नियोजन सत्ताधारी भाजपकडून ऐनवेळेस करण्यात आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते परंतु पास मात्र आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजपने केलेले गलिच्छ राजकारण असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे. आधीच या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान भाजपकडून करण्यात आला आहे. आणि आता विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारचे नियोजन केले गेले आहे.
कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधीची सुचना दोन तिन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक केले कृत्य असून या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
दोन थोर महापुरुषांसंबंधित असणाऱ्या महापालिकेच्या एका कार्यक्रमाला यायची इच्छा असताना देखील भाजपच्या घाणेरड्या राजकारणामुळे आम्हाला हजर राहता आले नाही. भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.




