पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या जिलेटीन सदृश्य वस्तूची तपासणी करण्यात आली आहे. ती स्फोटके नसल्याचे स्पष्ट झाले असून हा घातपाताचा प्रकार नाही. रेल्वे आणि पुणे पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. दुपारी बारा नंतर स्थानकावरील व्यवहार सुरळीत झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद गं. वायसे-पाटील यांनी सांगितले.
बॉम्बशोधक व नाशक पथकाने तसेच श्वान पथकाने वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित वस्तूची तपासणी करण्यासाठी तसेच ते स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निकामी करण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ही वस्तू नेण्यात आली. त्यानंतर ही बॉम्बसदृश्य वस्तू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनचा परिसर रिकामा करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेल्वे स्थानक परिसराचा आढावा घेतला. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले होते.
पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सामान्यपणे दुपारी पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आले होते. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आली.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. मात्र त्यानंतर तपासणी केली असता ही माहिती खोटी असल्याचं उघड झालं होतं.




