पाषाण मधील संत गोरा कुंभार शाळा बंद केल्याच्या प्रकरणाची शासनाकडून चौकशीचे आदेश ; अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना

पाषाण : पाषाण मधील नेहरू शिक्षण संस्था, पुणे संचलित गोरा कुंभार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यालय, या शासन अनुदानीत शाळा संस्थाचालकांनी विशिष्ठ हेतुपुस्सर एक एक वर्ग बंद करत पूर्ण बंद केल्या. यामुळे स्थानिक सर्वसामान्य घरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी या शाळा सुरू झाल्या पाहिजेत यासाठी लढा उभारला आहे. या संदर्भात सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार शाळा बंद प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

या विषया संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य अवर सचिव आ.रा.राजपूत यांनी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना चौकशीचे आदेश दिले असून चौकशीचा अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत सुरू केलेल्या पाठपुराव्याला पहिले यश मिळाले असून स्थानिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा लढा शाळा सुरू होईपर्यंत असाच सुरू राहणार असल्याचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले.
नेहरू शिक्षण संस्थेच्या पाषाण मधील शाळांबरोबरच कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड तसेच श्री. नागेश्वर विद्यालय निमोणे ता. शिरूर या शाळांमधील देखील सर्व वर्ग
बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्यामुळे आता या सर्व प्रकारची चौकशी होणार आहे.



या शाळा सुरू व्हाव्यात यासाठी पाषाण मधील माजी नगरसेवक तानाजी निम्हण व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेत घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेला ही माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या लढ्याला आणखीनच बळ मिळाले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत शासनाच्या शैक्षणिक संबधित सर्व विभागांकडे तक्रार अर्ज करत पाठपुरावा केल्याने अखेर चौकशीचे आदेश निघाले आहेत.






