अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. ओबीसी आरक्षणाविषयी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावर विचारणा केली असता अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत दाखल होण्याची ऑफर देऊ केली.
पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षणाविषयी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत. राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्राच्या हातातून गेलं. हा फार मोठा गुन्हा आहे. ओबीसी आरक्षण हा धक्का नसून धोका आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावर अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना भाजप सोडण्याचं आवाहन केलं.
मिटकरी म्हणाले,“ज्यांच्या वडिलांनी भाजप वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधं सन्मानाचं स्थान मिळालं नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दारं आपल्यासाठी उघडी आहेत. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे.”




