महाराष्ट्र

सावित्रीबाई फुलेंबद्दल विकृत लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करा : छगन भुजबळ

पुणे/मुंबई/नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भुजबळ यांनी म्हटले आहे की,’इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचे म्हटले आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

भुजबळ यांनी म्हटले आहे की, एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये