स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे’ मालिकेतून पुण्यातील बालकलाकार रुद्रांश भालेकर जिंकतोय प्रेक्षकांची मने..

पुणे : स्टार प्रवाह वाहिनीवर कोठारे व्हिजनची सुरू असलेल्या ‘उदे गं अंबे’ कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेला रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याने या मालिकेने मराठी रसिकांच्या मनामध्ये घर केले आहे. या मालिकेत पुण्यातील कर्वेनगर मध्ये राहणारा बालकलाकार रुद्रांश भालेकर जमदग्नीची भूमिका साकारत असून आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांची मने जिंकली आहेत.
महाराष्ट्रात पौराणिक मालिका पाहणारा मोठा चाहता वर्ग आहे. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं अनेकांचं श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. या देवीचं महात्म्य ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेतून भव्यदिव्य स्वरूपात सादर करण्यात आलं आहे. रोज सायंकाळी 6.30 वाजता ही मालिका प्रसारित होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारत आहे. अभिनेत्री मयुरी कापडणे आदिशक्तीची रुपं साकारत आहे. तर रुद्रांश भालेकर जमदग्नीच्या भूमिकेत आहे. रेणुकेची भूमिका अराध्या लवाटे साकारत आहे.
कर्वेनगर मध्ये राहणाऱ्या रुद्रांश भालेकर या बालकलाकाराला या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली असून त्याने या संधीच सोन केलं असं म्हणावे लागेल कारण उत्तम अभिनय करून त्याने मालिकेतील जमदग्नीच्या पात्राला न्याय दिला आहे. रुद्रांश भालेकर हा कर्वेनगर मधील मिलेनियम नॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून तो नववी इयत्तेत शिकत आहे. त्याच्यातील अभिनयाची आवड ओळखून आई अवंती व वडील चेतन भालेकर यांनी त्याला प्रोत्साहन दिले. विविध अभिनय कार्यशाळेत भाग घेत त्याला त्याची आवड कशी जोपासता येईल, अभिनयातील बारकावे त्याला कसे कळतील यासाठी प्रयत्न केले. त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळेच रुद्रांश याचा अभिनयाचा प्रवास स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून सुरू झाला आहे.

आई अवंती व वडील चेतन भालेकर यांनी सांगितले की, रुद्रांश मधील अभिनयाची आवड ओळखल्यानंतर ही आवड जोपासत असताना त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी आम्ही घेतली. ‘उदे गं अंबे’ या मालिकेसाठी जमदग्नीच्या पात्रासाठी ऑडिशन मधून त्याची निवड झाल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला पण, मुंबईत होणार मालिकेचं शूटिंग, त्याच्या वेळा, शाळेचा अभ्यास हे सर्व कसं मॅनेज करायच हा प्रश्न होता. पण यात शाळेचं सहकार्य मिळालं. आईने मुंबईत त्याच्यासोबत थांबून शूटिंग पूर्ण करायचं असा आम्ही निर्णय घेतला व मुंबईत राहण्याची व्यवस्था केली. शूटिंग करून आल्यानंतर रोजचा शाळेचा अभ्यास तो पूर्ण करत असतो व वेळ मिळेल तस आम्ही पुण्याला घरी येत असतो. मालिका शूटिंगच्या ठिकाणीही संपूर्ण ‘उदे गं अंबे’ टीमच सहकार्य मिळत असल्याने पहिली वेळ असतानाही त्याच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या.
रुद्रांश भालेकर म्हणाला, मला माझी अभिनयाची आवड जोपासता यावी म्हणून आई वडिलांची मोठी साथ मिळाली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझा टिव्ही मालिकेतील प्रवास सुरू झाला. ‘उदे गं अंबे ‘ मालिकेच्या शुटींग दरम्यान आई वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. या शुटींग दरम्यान आई माझ्या बरोबर होती. मालिकेतील काम माझ्यासाठी नवे होते पण सेटवर सर्वांनीच सांभाळून घेतल्याने मी रुळून गेलो. पौराणिक मालिका असल्याने युद्ध कला, भाषा या सर्व गोष्टींवर काम करावं लागलं पण काम करताना मजा आली.


