अर्थजगत
‘या’ निर्णयामुळे 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी करण्यात आला आहे. याबाबत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेप्रमाणे 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे.
राज्य सरकारच्या सीएनजीवरील कर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. महागाई नियंत्रणासाठी आणि प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.




